नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले,
बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ????
सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले.
नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक,
अस होय, या की मास्तर, बसा,
आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की...
रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली.
अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की,
नको नको, मला काही नको मी आपल्याला बोलायला आलो आहे,
अस कस मास्तर गरीबाच्या घरला आलेत,निदान चा तरी प्यावा
बर चालेल, पण अगदी थोडा....
रुखमा, चहा बनवायला झोपडीत गेली, दाराच्या आडोशाला उभी राहून नीता सर आणि तिच्या बाबांचे बोलणे ऐकत होती, तसेच चहा मांडताना तिची आई ही बोलण्याचा चाळ घेत होती.
नीता हुशार मुलगी आहे,आणि आम्हाला प्रकर्षानं वाटत की, नीताने दहावीचे पेपर द्यावे, मुलगी तुमचं नाव नक्की मोठं करेल..
पण मास्तर, मोलमजुरी करून प्पोट भरतोया, त्यात आता पुस्तक लेखणी चा खर्च वाढला, अमच्याने नाही झेपावणार....
पण उद्या तुमची लेक मोठी अधिकारी झाली तर त्याचा फायदा तुम्हाला च होणार आहे,
आम्हाला बी वाटतंया हो पण आमची सोय नाही मास्तर,
पण काही पैशांसाठी तुम्ही निताची जिंदगी डावाला लावताय, पोरीची शिकायची इच्छा आहे, तर शिकू द्या...
तुमचं संबंद बरोबर हाय मास्तर, पण पैका नसल्यावर आमचा बी नाईलाज हाय....
ठीक आहे, दहाविच्या सगळ्या शिक्षणाचा आम्ही खर्च देतो, पण आपण नीताला शाळेत नियमित येऊ द्या.... दहावीत चांगले गुण घेतले तर तिला शिष्यवृत्ती पण मिळेल,त्यानंतर तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही...
अस म्हणताय, पण मास्तर तिचा खर्च आम्ही आपल्या डोक्स्यावर कसा देऊ....आम्हाला बरोबर वाटणार नाय..
आपण त्याची काळजी करू नका,नीता माझी मुलगी समजून मी तिचा खर्च करेल मगतर झाले ना....
नीताचे बाबा सर च्या पाया पडत म्हणाले,
तुमचे लई लई उपकार मास्तर,
सर आपले पाय मागे घेत म्हणाले,
अहो अहो काय करताय, मी फक्त माझे कर्तव्य पार पाडतो आहे, बर मी निघतो,शाळेला उशीर होतोय....
चहाचा कप खाली ठेवत सरांनी त्या तोडक्या मोडक्या झोपडीकडे बघितले, दाराच्या आडोशातून एक प्रसन्न हास्याने भरलेला चेहरा दिसला. ते बघून सरांना खूप समाधान वाटले.
नीता रोज शाळेत जात होती,मन लावून अभ्यास करत होती, सर सुद्धा तिच्याकडे कोणते पुस्तक नाही, काय हवंय नको ते बघत होते. सरांना अनेकांची बोलणी ऐकायला मिळत होती पण त्याकडे सर विषेश लक्ष देत नसे. काही लोकांनी तर नीता आणि सरांचे नाव देखील जोडले होते परंतु नीता आपल्याला आपल्या मुलाप्रमाणे आहे मग आपण लोकांच्या विचारांचे चयन का करावे अशा विचारांनी ते दुर्लक्ष करत होते. असे करत करत दहावीचे वर्ष पूर्ण झाले.
सरांच्या विश्वासा प्रमाणे, नीताने अव्वल येऊन शाळेचेच नव्हे तर तिच्या गावचे नाव काढले होते. जिल्यातून पहिली येण्याचा मान नीताने मिळवला होता. नीताला स्पर्धा देण्याऱ्या मुलांचे तोंड फुग्यासारखे फुगले होते. आपण कुठे चुकलो हे बघण्यापेक्षा ती पुढे का गेली म्हणून ते नाराज होते. काहींनी तर घरात चिडचिड करून राग ही व्यक्त केला होता. स्कॉलरशिप घेण्याची वेळ झाली. सर्वत्र तिच्या नावाचा जयजयकार होऊ लागला परंतु तिची नजर कोणालातरी शोधत होती. सर आडोशाला जाऊन तिला भरभरून आशीर्वाद देत होते. आपण ठेवलेल्या विश्वासाला नीता पात्र ठरली होती. लोकांची बोलणी हवेगत उडून गेली होती. आणि दुरून नीताने मनोमम मानलेल्या आभाराचा चेहरा दिसत होता. आपला हातातील पारितोषिक सरांना देत नीताने आशीर्वाद घेतले.परंतु म्हणतात ना , लोकांना दुसऱ्याचे भले फार काळ पचत नाही. नीताच्या घरच्यांना काड्या करत मनात भरून दिले.
मास्तर, तुम्ही कस फिरकलात, आमच्या झोपडीकड...
पुन्हा आपल्याकडे येण्याची वेळ आली...
काय म्हणताय मास्तर,
मी असं ऐकलं की आपण नीता चे लग्न करणार आहात???
व्हय मास्तर,
स्कॉलरशिप मिळाली नीता ला, आता तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही मग मध्येच लग्नाचे....
चांगलं पोरगं हाय, घरला शेती, गुर ढोर हायती, आमच्या ईश्वाला अठरा ईश्व दारिद्र्य, आता पोरगी सुखात राहील या पावण्याकड.....
पण ती जर शिकली तर यापेक्षा कितीतरी चांगले स्थळ चालून येतील.....
आमचा निर्णय पक्का हाय मास्तर, एकदा ऐकल तुमचं, आता नाही जमायचं.....
लोकांच्या सांगण्या हुन जर तुम्ही तिचे आयुष्य उद्धवस्त करत असाल तर काही दिवसाने पस्तावा नक्की येणार.. आपण तिचा विचार करावा....
पण मास्टर,
त्याचे बोलणे मधात तोडत सर म्हणाले,
तुमचे बोलणे मध्येच थांबवतो आहे ,माफी असावी, पण एकदा विचार करा, मी म्हणतो म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणते म्हणून तरी.....
व्हय मास्तर,
आम्ही नीताला नेहमी मेडल घेताना पाहिले आहे, आत्ताही अपेक्षा आहे की तिच्या हाती मेडल च असेल.... निघतो मी, तुमच्या उत्तराची वाट पाहिलं.....
सर जागेवरून उठले, आणि नेहमीप्रमाणे दाराकडे बघितले, दाराच्या मागे तोच चेहरा होता, पण हास्य कुठे तरी हरवले होते, आशेने भरलेल्या नजरेने ती सरांकडे बघत होती. सरांनी लगेच आपली पाऊले शाळेच्या दिशेने टाकली.....
नीताने बारावीचे सगळे पेपर दिले, रिझल्ट्ही आला, नीताने यावर्षी ही बारावीत जिल्ह्यातुन प्रथमतेचे प्राविण्य मिळवले होते. सगळीकडे झोपडीत राहणाऱ्या नीताचे कौतुक होत होते, घरात लाईट नको, शिक्षणाचे वातावरण नको, पुस्तक घ्यायला पैसे नाहीत असे असताना नीताने आपली छबी जिल्ह्यात उतरवली होती.
आज निताचा सत्कार समारंभ होता. निताचे नाव घेण्यात आले पण नीता पुढे आली नाही. सर भिरभिर सगळीकडे शोधू लागले, पुन्हा निताचे नाव घेण्यात आले, टाळ्यांचा कडकडाट वाजत होता. नीता अजूनही दृष्टीस आली नाही. शेवटी सरांनी नितातर्फे सत्कार स्वीकारावा असे ठरले, सरांनी सत्कार स्वीकारला. सरांनी तिच्या यशाचे कौतुक भरभरून गायिले आणि सर नीताच्या घराकडे जाऊ लागले. यापुढे नीताने मोठ्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा, खूप मोठे बनावे याचा विचार करत करत सर घराजवळ पोहचले. घरच्या आजूबाजूला कल्लोळ होता. वाजनत्री बाहेर उभे होते, झोपडी सजवली होती, बायकांचा घोळका नटून थटून मिरवत होता. गर्दीत कोणी दिसत नव्हते. सरांनी बाजूच्या मुलाला विचारले,
नीता दिसते का,
त्या मुलाने बोट दाखवले, त्यादिशेने सरांची नजर गेली. हातातील पारितोषिक सहज गळून पडले. फुले पार मुरगळुन गेली, सरांच्या डोळ्याच्या कडा चिंब झाल्या. समोर नीता बहुल्यावर चढली होती. मेडल ऐवजी गळ्यात मंगळसूत्र होते. पारितोषिक एवजी हातात फुलांची माळ होती, ते बघून सरांच्या डोक्यात सहज विचार आला,
आपण एक हुशार डॉक्टर गमावली, एक इंजिनिअर गमावली, एक प्राध्यापक गमावली, एक देशाचे उज्वल भविष्य गमावले. आता तिचे आयुष्य चुलीच्या धुरात व मुलाच्या आवाजात कटणार होते. सरांनी पडलेले पारितोषिक उचलले आणि नीता च्या हातात दिले. नीताने ते बघताच दाटून ठेवलेला हुंदका उफाळून आला. सरांशी काही बोलणार की तिला ओढत नेले आणि हातातील पारितोषिक अलगद विवाहाच्या मंडपातील हवन कुंडात पडले. नाही तरी त्याचा कचराच होणार होता.
सरांनी पाहिलेले उज्वल भविष्य कष्टाच्या दुनियेत दिसत होते......
टीप :- ( बऱ्याच वेळा हुशार मुलींचा असा अंत झालेला दिसतो. कोणत्याच क्षेत्रात कमी नसलेल्या मुली असल्या तरी काही ठिकाणी अस्तित्वातून सुद्धा निघून जातात. आणि बहुदा त्याला घरातील मानसिकता, घरची परिस्थिती हेच कारण असते. म्हणून मुलींना शिकू द्या. त्यांच्या शिक्षणाने देशाला उत्कृष्ट सेवक तर मिळेलच पण सोबत एका घराला समर्थपणे सावरणारे व्यक्तिमत्त्व सुद्धा मिळेल. माझ्या लिखाणाची दिशा नेहमी समाजहित कारक असते, संकल्पना कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की कळवा. )
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. एक चिट्ठी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
खुप सुंदर " झुंज " या कथेच्या माध्यमातून मांडली . एक नाहीं तर अश्या अनेक स्त्रिया देशात आहेत जे शिक्षण क्षेत्रापासून वंचित आहेत ,आणि खरंच या कथेमधून सर्व देशातील ,समाजातील लोकांनीं स्त्रियांविषयी योग्य निर्णय घ्यावा जेणेकरून त्यांना त्यांचा अधिकारचं फायदा घेता येईल . 💐 छान तेजु एक सामाजिक msg दिली .
ReplyDelete'झुंज' ही कथा अप्रतिम आहे. एका मुलीची शिक्षणाची गोष्ट ही सर्वांना मन अचंबित करायला लावणारी आहे.
ReplyDelete'झुंज' ही कथा अप्रतिम आहे. एका मुलीची शिक्षणाची गोष्ट ही सर्वांना मन अचंबित करायला लावणारी आहे.
ReplyDelete'झुंज' ही कथा अप्रतिम आहे. एका मुलीची शिक्षणाची गोष्ट ही सर्वांना मन अचंबित करायला लावणारी आहे.
ReplyDelete